सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या हालचाली
ठाणे: ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी आदर्श ‘मॉडेल’ ठरणार असून, अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेचे केंद्र म्हणून त्याचा विकास करण्यात येत आहे. नव्याने उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
कोकण विभागाच्या आरोग्य आढावा बैठकीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त तथा अभियान संचालक संजय काटकर यांनी या अद्ययावत इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परघे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी इमारतीमधील अद्ययावत ऑपरेशन थिएटर, सुसज्ज आयसीयू कक्ष, सीटी स्कॅन, एमआरआय यांसह अत्यंत आधुनिक वैद्यकीय उपकरणांची आणि पायाभूत सुविधांची बारकाईने पाहणी केली. या सर्व सुविधा सामान्य रुग्णांसाठी विनाविलंब सुरू व्हाव्यात यासाठी प्रशासकीय व तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करण्याच्या सूचना त्यांनी डॉ. अशोक नांदापूरकर आणि डॉ. कैलास पवार यांना दिल्या. तसेच या रुग्णालयाची व्याप्ती आणि क्षमता पाहता, कामकाजाला अधिक गती देण्यासाठी या रुग्णालयाला ‘स्टेट लेव्हल’ (राज्यस्तरीय) दर्जा देण्याबाबत सविस्तर खल झाला. रुग्णालयातील काही तांत्रिक व वैद्यकीय पदांचे नामनिर्देश बदलून त्यांचा उपयोग रुग्णांच्या थेट सेवेसाठी व कार्यक्षमतेसाठी कसा करून घेता येईल, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यावरही भर देण्यात आला.
बैठकीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा आढावा घेऊन, या पंधरवड्यात बालकांची शंभर टक्के तपासणी तसेच आवश्यक शस्त्रक्रिया व उपचार पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच रुग्णालयातील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, औषधसाठा आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या नियमित देखभालीवरही भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अधिकारी विनोद जोशी यांनी दिली.